समाजात जेव्हा एखाद्या महामानवाच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते, तेव्हा अनेकदा एक गंभीर चूक घडताना दिसते. त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनकार्याचा, त्याच्या विचारांचा, समाजकारणाचा, राष्ट्रकारणाचा आणि सांस्कृतिक योगदानाचा विचार करण्याऐवजी त्याला एका विशिष्ट निकषावर मोजण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः आजच्या काळात, अनेकदा एखाद्या महापुरुषाचे मूल्यांकन करताना “त्यांनी दलितांसाठी काय केले?” हा अज्ञानीपणाचा एकमेव किंवा प्रमुख प्रश्न विचारला जातो. एखाद्या ठराविक समाजासाठी हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी तोच एखाद्या महामानवाचे संपूर्ण मूल्यमापन करण्याचा अंतिम निकष असू शकत नाही. कारण अशा संकुचित निकषामुळे सर्वसमावेशक कार्य करणार्या महापुरुषांचे चरित्र झोकाळले जाते आणि केवळ दलितांसाठी कार्य करणारे महान बनतात. हि सवय आता कालबाह्य होणे आवश्यक आहे.
कोणताही महामानव हा एका समाजघटकापुरता मर्यादित नसतो. तो आपल्या काळातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीशी संवाद साधत असतो. त्याचे कार्य अनेक स्तरांवर विस्तारलेले असते. त्यामुळे त्याचे मूल्यांकन करताना त्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्राचा विचार करणे आवश्यक असते.
समाजसुधारणा, शिक्षण, राष्ट्रनिर्माण, सांस्कृतिक जागृती, आर्थिक विकास, सामाजिक समता, विज्ञान, अध्यात्म, प्रशासन, साहित्य, कला किंवा स्वातंत्र्यलढा अशा विविध क्षेत्रांत अनेक महामानवांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन केवळ एका विशिष्ट सामाजिक घटकासाठी त्यांनी काय केले किंवा काय केले नाही, या चौकटीत केले, तर त्यांच्या कार्याच्या व्यापकतेवर अन्याय होतो. एखाद्या महामानवाचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि योगदान समजून घेण्यासाठी तो केवळ एक घटक ठरू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने शिक्षणक्रांती घडवली असेल, सामाजिक समरसतेचा विचार मांडला असेल, राज्यकारभारात लोककल्याणाची तत्त्वे रुजवली असतील, सांस्कृतिक पुनर्जागरण घडवले असेल किंवा राष्ट्रीय अस्मितेला नवे स्वरूप दिले असेल, तर त्या सर्व बाबींचाही तितक्याच गांभीर्याने विचार झाला पाहिजे.
आजच्या सार्वजनिक चर्चांमध्ये अनेकदा इतिहासातील व्यक्तिमत्त्वांकडे वर्तमान राजकीय आणि सामाजिक चष्म्यातून पाहिले जाते. परिणामी, त्यांच्या संपूर्ण कार्याऐवजी त्यांच्या जीवनातील एखादा विशिष्ट पैलू अधोरेखित केला जातो आणि उर्वरित योगदान दुय्यम ठरते. ही प्रवृत्ती केवळ इतिहासाच्या अभ्यासासाठीच नव्हे, तर समाजाच्या बौद्धिक प्रगल्भतेसाठीही घातक ठरू शकते.
महामानवांना समजून घेण्यासाठी त्यांचा काळ, त्यांच्यासमोरील आव्हाने, त्यांनी स्वीकारलेली साधने, त्यांची मूल्यव्यवस्था आणि त्यांच्या कार्याचा दीर्घकालीन परिणाम या सर्व बाबींचा एकत्रित विचार होणे आवश्यक आहे. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर हे त्यांच्या संपूर्ण कार्याचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.
आज गरज आहे ती महामानवांचे वर्गीकरण करण्याची नव्हे, तर त्यांचे समग्र आकलन करण्याची. “त्यांनी अमुक एका समाजासाठी काय केले?” या प्रश्नापलीकडे जाऊन “त्यांनी समाज, राष्ट्र आणि मानवतेसाठी काय योगदान दिले?” हा व्यापक प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. कारण महामानवांचे मोठेपण हे त्यांच्या कार्याच्या एका भागात नसते; ते त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याच्या व्यापकतेत आणि मानवकल्याणाच्या दृष्टिकोनात असते.
म्हणूनच, एखाद्या महामानवाचे मूल्यमापन करताना केवळ त्यांनी दलितांसाठी काय केले किंवा काय केले नाही, हा एकमेव निकष मानण्याची प्रवृत्ती आपण आता मागे सोडली पाहिजे. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांकडे अधिक व्यापक, संतुलित आणि समग्र दृष्टीकोनातून पाहणे हीच खरी बौद्धिक प्रगल्भता आणि इतिहासाबद्दलची प्रामाणिकता ठरेल.
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः