अलिकडच्या काही काळात “पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध” असा एक अपप्रचार काही सामाजिक आणि राजकीय विचारप्रवाहांकडून सातत्याने केला जात आहे. या मताच्या समर्थनासाठी वारकरी संतांचे काही निवडक अभंग उद्धृत केले जातात. विशेषतः संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत बहिणाबाई यांच्या अभंगांतील “बौद्ध रूप” या उल्लेखांचा आधार घेऊन विठ्ठल आणि गौतम बुद्ध हे एकच असल्याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि, अशा प्रकारचे प्रतिपादन करणाऱ्यांपैकी अनेकांकडून हिंदू धर्मशास्त्र, वैष्णव परंपरा, वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि संतसाहित्य यांचा समग्र अभ्यास झालेला दिसून येत नाही. परिणामी, संतवाङ्मयातील एखादा शब्द किंवा ओळ तिच्या मूळ संदर्भापासून वेगळी काढून, त्यावर पूर्वनिश्चित वैचारिक निष्कर्ष लादण्याची प्रवृत्ती दिसून येते. परंतु संतवाङ्मयाचा अभ्यास हा संदर्भ, परंपरा, तत्त्वज्ञान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांच्या एकत्रित विचारातूनच केला पाहिजे. अन्यथा, तो संशोधनाचा विषय न राहता अर्थविपर्यासाचा विषय बनतो. म्हणूनच “विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध” हा निष्कर्ष वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी, पुराणपरंपरेशी आणि संतांच्या मूळ अभिप्रायाशी सुसंगत आहे का, या प्रश्नाचा चिकित्सक आणि संशोधनात्मक दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक ठरते.
वारकरी संप्रदायाची मूलभूत भूमिका : विठ्ठल म्हणजे विष्णू-कृष्ण
वारकरी संप्रदायाचा पाया हा वैष्णव भक्तीपरंपरेवर उभा आहे. वारकरी परंपरेतील सर्व प्रमुख संतांनी विठ्ठलाला श्रीकृष्ण, हरि, नारायण, विष्णू किंवा पांडुरंग या स्वरूपात स्वीकारले आहे. मराठी विश्वकोशातही स्पष्टपणे नमूद केले आहे की वारकरी संप्रदायातील संतांची धारणा विठोबा हा श्रीकृष्णाचेच रूप आहे अशी आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात –
“बाप रखुमादेवीवरू पंचविसावा”
याचा अर्थ, विष्णूच्या चोवीस अवतारांपलीकडे असलेले परब्रह्म स्वरूप म्हणून विठ्ठलाची उपासना केली जाते; परंतु ते कधीही गौतम बुद्ध म्हणून स्वतंत्रपणे प्रतिपादित केलेले नाही.
तसेच तुकाराम महाराज म्हणतात ,
“गीता जेणें उपदेशिली, तेचि विटेवरी माउली”
इथे संत तुकाराम महाराज सांगतात की अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश करणारे भगवान श्रीकृष्ण आणि पंढरपूरच्या विटेवर उभे असलेले श्रीविठ्ठल हे एकच परमेश्वर आहेत. त्यामुळे विठ्ठलभक्ती ही भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे. वारकरी संप्रदायाचा पाया वेद, गीता आणि श्रीकृष्णाच्या उपदेशावरच आधारित आहे.
संतांच्या दृष्टीतून “बौद्ध रूप” म्हणजे काय?
वारकरी संत जेव्हा “बौद्ध रूप” हा शब्द वापरतात, तेव्हा ते गौतम बुद्ध आणि विठ्ठल यांची ऐतिहासिक किंवा जैविक एकरूपता सांगत नाहीत. ते तत्कालीन वैष्णव पुराणपरंपरेतील विष्णूचा नववा अवतार – बुद्धावतार याचा उल्लेख करतात.
हिंदू पुराणपरंपरेत बुद्धाला विष्णूचा अवतार मानण्याची परंपरा प्राचीन आहे. दशावतार संकल्पनेत बुद्ध हा नववा अवतार मानला जातो. म्हणून संतांच्या अभंगातील “बौद्ध रूप” हा शब्द “विष्णूच्या बुद्धावताराचे स्वरूप” या अर्थाने आहे, “विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध” या अर्थाने नाही.
“विठ्ठल हाच बुद्ध” या आधुनिक प्रतिपादनाचे चिकित्सक खंडन
आज काही विचारप्रवाहांकडून “पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध” असा दावा केला जातो. या दाव्याच्या समर्थनासाठी वारकरी संतांच्या काही अभंगांचा संदर्भ दिला जातो. मात्र संतवाङ्मय, पुराणपरंपरा, वारकरी तत्त्वज्ञान आणि इतिहासशास्त्र यांचा एकत्रित अभ्यास केल्यास हा निष्कर्ष अत्यंत अपुरा आणि संदर्भविरहित असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी संतांचा नेमका दृष्टिकोन कोय होता त्याविषयी त्यांच्याच अभंगाच्या माध्यमातून जाणून घेणे आवश्यक आहे.
लोक देखोनी उन्मत्त, दारांनी आसक्त!
न बोले बौद्धरूप, ठेविले जघनी हात||
नववा वेसे स्थिर रूप, तथा नाम बौद्धरूप | १
धर्म लोपला अधर्म जाहला, हे तू न पाहसी |
या लागी बौद्धरूपे, पंढरी नांदसी || – संत एकनाथ महाराज
या अभंगामध्ये केवळ “बौद्ध रूपे” वाचून विठ्ठल हाच बुद्ध म्हणणे घाईचे ठरेल त्यासाठी संपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. या अभंगातील “नववा वेसे” हे शब्द महत्वाचे आहेत. संत एकनाथ स्पष्ट सांगतात की, हा विष्णूचा नववा अवतार, म्हणजे बुद्धावतार आहे. जर विठ्ठल हाच स्वतंत्र गौतम बुद्ध आहे असे सांगायचे असते, तर “नववा वेसे” हा विशेष उल्लेख करण्याचे कारणच नव्हते. “न बोले” हा उल्लेखही बुद्धावताराच्या मौन, करुणा आणि ध्यानमय स्वरूपाकडे निर्देश करतो. त्यामुळे येथे विठ्ठल हा विष्णूच्या बुद्धावताराची आठवण करून देणारा आहे; तो गौतम बुद्धाशी पूर्णपणे समरूप आहे असा दावा येथे नाही.
बौध्यअवतार माझिया अदृष्टा।
मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।
लोकांचियेसाटी शाम चतुर्भुज ।
संतांसवे गुज बोलतसा ।।
आले कलियुग माझिया संचिता ।
डोळां हाकलिता न पडेसी ।।
म्याच तुझे काय केले नारायणा ।
का नये करुणा तुका म्हणे ।। – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांच्या “बौध्यअवतार माझिया अदृष्टा, मौन्य मुखें निष्ठा धरियेली…” या अभंगाचा संदर्भ लक्षात घेतला, तर ते येथे कोणत्याही स्वतंत्र ऐतिहासिक गौतम बुद्धाशी संवाद साधत नाहीत, तर प्रत्यक्ष “नारायण” अर्थात विष्णूशी संवाद साधत आहेत. याचा स्पष्ट पुरावा अभंगाच्या शेवटच्या चरणात दिसतो – “म्याच तुझे काय केले नारायणा, का नये करुणा तुका म्हणे”. येथे तुकाराम महाराज नारायणाला प्रश्न विचारत आहेत की, “हे नारायणा, तुझा जो बौद्धावतार आहे, त्याचे दर्शन मला का झाले नाही? मी असे कोणते अपराध केले की तुझी करुणा माझ्यावर झाली नाही?” यामुळे “बौध्यअवतार” हा शब्द विष्णूच्या दशावतारांतील नवव्या अवताराच्या संदर्भात वापरलेला आहे, हे स्पष्ट होते. जर संत तुकाराम महाराजांना विठ्ठल हाच स्वतंत्र गौतम बुद्ध आहे असे प्रतिपादन करायचे असते, तर ते अभंगाच्या अखेरीस “नारायणा” अशी हाक मारली नसती. उलट, त्यांनी बौद्धावतार हा नारायणाचाच एक अवताररूप आहे, अशीच वैष्णव आणि वारकरी परंपरेतील प्रस्थापित धारणा या अभंगातून व्यक्त केली आहे. याच अभंगातील “लोकांचियेसाटी शाम चतुर्भुज, संतांसवे गुज बोलतसा” ही ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. “श्याम चतुर्भुज” हा शब्दप्रयोग वैष्णव परंपरेत विष्णू-कृष्णासाठी वापरला जातो. “श्याम” म्हणजे सावळे श्रीकृष्णस्वरूप आणि “चतुर्भुज” म्हणजे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणारे विष्णूरूप. संत तुकाराम महाराज येथे स्पष्टपणे सांगतात की, लोकांसाठी तू श्यामवर्णी चतुर्भुज विष्णूच्या स्वरूपात प्रकट होतोस, तर संतांशी मात्र तू अंतःकरणातील गूढ संवाद साधतोस. याच अभंगाच्या प्रारंभी ते “बौध्यअवतार माझिया अदृष्टा” असे म्हणतात आणि शेवटी “म्याच तुझे काय केले नारायणा” अशी विष्णूला आर्त हाक मारतात. त्यामुळे या अभंगातील तीनही संज्ञा – “बौध्यअवतार”, “श्याम चतुर्भुज” आणि “नारायणा” – या एकाच दैवताकडे, म्हणजे विष्णूकडे निर्देश करतात.
कलयुगी बौद्ध रूप धरी हरी ।
तुकोबा शरीर प्रकटला ॥६॥ – संत बहिणाबाई
संत बहिणाबाईंच्या “कलयुगी बौद्ध रूप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ॥” या अभंगातील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे “हरी”. वारकरी संप्रदायात “हरी”, “नारायण”, “गोविंद”, “केशव” आणि “विष्णू” हे एकाच परब्रह्माचे पर्यायवाची नामरूप मानले जातात. बहिणाबाई येथे “बौद्ध रूप धरी हरी” असे म्हणतात, “बुद्ध हरी झाला” किंवा “हरी म्हणजे बुद्ध” असे म्हणत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, कलियुगात स्वतः हरी, म्हणजेच विष्णू, बौद्धरूप धारण करतो. ही संकल्पना वैष्णव पुराणपरंपरेतील बुद्धावताराच्या कल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे.
गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रांवरू |
आपण योगेश्वरू बौद्धरुपी ||
व्रत भंगासाठी बौद्ध अवतार |
झाला दिगंबर अवनिये || – संत एकनाथ महाराज
संत नामदेव महाराजांच्या “गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रांवरू । आपण योगेश्वरू बौद्धरुपी ॥” या अभंगाचा विचार केला, तर ते येथे स्पष्टपणे श्रीकृष्णाचाच उल्लेख करीत आहेत. “गोकुळी अवतारू” हा शब्द गोकुळात जन्मलेल्या श्रीकृष्णाकडे निर्देश करतो, तर “सोळा सहस्त्रांवरू” हा उल्लेख श्रीकृष्णाच्या सोळा हजार राण्यांच्या पुराणप्रसिद्ध कथेशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे “योगेश्वरू” ही उपाधी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णासाठी वापरलेली असून, ती वैष्णव परंपरेत श्रीकृष्णाचे एक महत्त्वाचे नाव मानली जाते. अशा प्रकारे, संत नामदेव महाराज एकाच चरणात “गोकुळी अवतार”, “सोळा सहस्त्रांवरू” आणि “योगेश्वरू” हे तीनही विशिष्ट कृष्णसंबंधित उल्लेख करतात आणि त्यानंतर त्याच दैवताला “बौद्धरुपी” असे संबोधतात. यावरून त्यांचा स्पष्ट अभिप्राय असा दिसून येतो की, श्रीकृष्ण, म्हणजेच विष्णू, हाच पुढे बुद्धावतार धारण करतो. येथे “बौद्धरुपी” हा शब्द गौतम बुद्ध आणि विठ्ठल किंवा कृष्ण यांची ऐतिहासिक एकरूपता दर्शविण्यासाठी वापरलेला नसून, विष्णूच्या विविध अवतारांच्या एकत्वाची वैष्णव संकल्पना व्यक्त करण्यासाठी वापरलेला आहे. उलट, जर संत नामदेव महाराजांना “विठ्ठल हाच गौतम बुद्ध” असे प्रतिपादन करायचे असते, तर ते “गोकुळी अवतार”, “सोळा सहस्त्रांवरू” आणि “योगेश्वरू” हे विशुद्ध कृष्णवाचक आणि वैष्णव शब्दप्रयोग वापरण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे या अभंगातून सिद्ध होणारा निष्कर्ष असा की, संत नामदेव महाराजांच्या मते बुद्ध हा श्रीकृष्णाचाच, पर्यायाने विष्णूचाच, एक अवताररूप आहे; तो विठ्ठलापासून किंवा विष्णूपासून वेगळा आणि स्वतंत्र असा अंतिम तत्त्व नाही.
ऐसा हा देवानें थोर पवाडा केला ।
पूर्व अवतारीं झाला हयग्रीव ॥१॥
मग अंबऋषिसाठीं पडियेला संकटीं ।
मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ॥२॥
होउनी कच्छप पर्वत धरिला ।
वराहें मारिला दैत्य भार ॥३॥
तयाचा सहोदर मृत्यु नाहीं ऐसा वर ।
तेव्हां नारसिंह झाला अवतार ॥४॥
अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन ।
भार्गव तो निधान दाशरथी ॥५॥
होऊनियां कृष्ण कंस वधियेला ।
आतां बुद्ध झाला सखा माझा ॥६॥
लीला अवतारीं हरि करी खेळ नाना ।
म्हणे जनी जाणा तैं मी होत्यें ॥७॥ – संत जनाबाई
संत जनाबाईंच्या “होऊनियां कृष्ण कंस वधियेला । आतां बुद्ध झाला सखा माझा ॥” या अभंगातील संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. या अभंगात जनाबाई सुरुवातीपासूनच विष्णूच्या विविध अवतारांची अनुक्रमाने मांडणी करतात—हयग्रीव, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम आणि पुढे श्रीकृष्ण. विशेषतः “होऊनियां कृष्ण कंस वधियेला” या चरणात त्या स्पष्टपणे कंसवध करणाऱ्या श्रीकृष्णाचा उल्लेख करतात, जो वैष्णव परंपरेनुसार विष्णूचा अवतार मानला जातो. त्यानंतर लगेचच त्या म्हणतात, “आतां बुद्ध झाला सखा माझा”. याचा अर्थ असा नाही की श्रीकृष्ण आणि ऐतिहासिक गौतम बुद्ध हे एकच व्यक्तिमत्त्व आहे; तर ज्याने पूर्वी कृष्णावतार धारण करून कंसाचा वध केला, तोच माझा सखा असलेला परमेश्वर आता बुद्धावताराच्या रूपाने प्रकट झाला आहे. या अभंगातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संत जनाबाई संपूर्ण अभंगात एका अखंड दैवी तत्त्वाच्या विविध अवतारांचे वर्णन करतात आणि शेवटी “लीला अवतारीं हरि करी खेळ नाना” असे स्पष्टपणे सांगतात. म्हणजेच, विविध अवतार धारण करून विविध लीला करणारा “हरि” अर्थात विष्णू हाच त्यांच्या भक्तीचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे “आतां बुद्ध झाला सखा माझा” या विधानाचा अर्थ “माझा सखा विठ्ठल म्हणजेच गौतम बुद्ध” असा नसून, “माझा सखा हरि, ज्याने पूर्वी कृष्णावतार धारण केला, त्यानेच बुद्धावतारही धारण केला” असा आहे. हा अभंग प्रत्यक्षात बुद्ध हा विष्णूचाच एक अवतार आहे, या वारकरी आणि वैष्णव परंपरेतील श्रद्धेचा पुरावा ठरतो.
क्रोध वैरी त्याची दवडावे बाहेरी ।
आशा तृष्णा वासना थोरी पीडिती हरी सर्वदा ॥ – समर्थ रामदास स्वामीं
काही अभ्यासक या ओळींमध्ये बौद्ध तत्त्वज्ञान शोधतात. परंतु काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा त्याग ही केवळ बौद्ध संकल्पना नाही. भगवद्गीता, भागवत, उपनिषदे आणि संतवाङ्मय यामध्येही हीच शिकवण सातत्याने आढळते. त्यामुळे केवळ साम्य दिसल्यामुळे उगम एकच ठरवणे ही शास्त्रीय पद्धत नाही.
समर्थ रामदास स्वामींच्या “क्रोध वैरी त्याची दवडावे बाहेरी । आशा तृष्णा वासना थोरी पीडिती हरी सर्वदा ॥” या वचनातील “हरी” हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय भक्तिपरंपरेत “हरी” हे नाव प्रामुख्याने विष्णू, नारायण किंवा श्रीकृष्ण यांच्यासाठी वापरले जाते. समर्थ रामदास स्वामींच्या संपूर्ण वाङ्मयातही “हरी”, “राम”, “नारायण” आणि “गोविंद” हे शब्द परमेश्वराच्या वैष्णव संकल्पनेसाठी वारंवार वापरलेले आढळतात. या ओवीत समर्थ मनुष्याच्या अंतःकरणातील क्रोध, आशा, तृष्णा आणि वासना या शत्रूंचे वर्णन करतात आणि त्या आध्यात्मिक प्रगतीस बाधक ठरतात, असे सांगतात. “पीडिती हरी सर्वदा” या वाक्याचा अर्थ असा होतो की, या आसक्ती आणि वासनांनी हरीभक्त अथवा हरिच्या मार्गावरील साधकाला सतत त्रास होतो. येथे “हरी” हा शब्द गौतम बुद्ध किंवा कोणत्याही इतर ऐतिहासिक व्यक्तीसाठी वापरलेला नसून, वैष्णव परंपरेतील परमेश्वर अर्थात विष्णूसाठीच वापरलेला आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामींच्या या वचनातूनही “हरी” म्हणजे विष्णू हीच पारंपरिक आणि संदर्भसुसंगत व्याख्या स्पष्टपणे सिद्ध होते.
वारकरी संतांच्या अभंगांमध्ये “बौद्ध रूप” हा उल्लेख निश्चितच आहे; परंतु त्याचा अर्थ “विष्णूचा नववा अवतार – बुद्धावतार” असा आहे. त्यामुळे विठ्ठल आणि बुद्ध एकच असतील तर बुद्ध आपोआपच विष्णूचे नववे अवतार ठरतात. आणि बुद्धांना विष्णूचा अवतार अमान्य करून “पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे गौतम बुद्ध” असा निष्कर्ष काढणे हे संतवाङ्मयाच्या संदर्भाचे विकृतीकरण आहे.
वारकरी संतांची भूमिका स्पष्ट आहे —
कृष्ण तोच विष्णू, विष्णू तोच विठ्ठल, आणि विष्णूचाच नववा अवतार म्हणजे बुद्ध.
म्हणूनच संतांच्या अभंगांचा अभ्यास संपूर्ण परंपरा, तत्त्वज्ञान, ऐतिहासिक संदर्भ आणि संतांच्या एकूण वाङ्मयाच्या आधारे केला पाहिजे; एखादी ओळ किंवा शब्द वेगळा काढून त्यावर आधुनिक राजकीय, सामाजिक किंवा वैचारिक निष्कर्ष लादणे हे संशोधन नसून अर्थविपर्यास ठरतो. संतवाङ्मयातील एखाद्या संज्ञेचा तिच्या मूळ संदर्भापासून विलग करून, आपल्या पूर्वग्रहांना किंवा वैचारिक भूमिकांना पुष्टी देण्यासाठी तिचा वापर करणे ही शास्त्रीय संशोधनपद्धती नाही. आपल्या स्वार्थासाठी, स्वतःला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने संतवचनांचे अर्थ लावणे आणि त्यांचा उपयोग आपल्या पूर्वनिश्चित निष्कर्षांना समर्थन देण्यासाठी करणे हे केवळ खेदजनक आणि दुर्दैवीच नाही, तर ते संतसाहित्याशी आणि इतिहासाशी केलेली बौद्धिक बेईमानी आहे. संतांच्या अभंगांचा आदर राखायचा असेल, तर त्यांच्या शब्दांचा नव्हे, तर त्यांच्या अभिप्रायाचा आणि संपूर्ण परंपरेच्या संदर्भाचा प्रामाणिकपणे विचार करणे आवश्यक आहे.
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः
One comment
Pingback: हिंदूंनी बुद्धांचा विरोध नव्हे, तर त्यांच्या मूळ विचारांचा सन्मान करावा – डेक्कन अँगल