हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काही घटनांची नोंद इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी झाली, तर काही घटना आणि त्यांचे नायक काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीही इंग्रजी सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले होते. अशाच एका उठावाद्वारे इंग्रज सत्तेला सलग अनेक वर्षे सळो की पळो करून सोडणारा, स्वातंत्र्याचे स्वप्न सर्वप्रथम पाहणारा आणि परकीय सत्तेविरुद्ध संघटित सशस्त्र लढा उभारणारा महाराष्ट्रातील एक निधड्या छातीचा वीर म्हणजे आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक होय.
दुर्दैवाने, रामोशी-बेरड समाज वगळता इतर समाजांमध्ये उमाजी नाईक यांचे कार्य आणि योगदान अपेक्षित प्रमाणात पोहोचले नाही. परिणामी, उमाजी नाईक हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते असल्याचा गैरसमज निर्माण झाला. प्रत्यक्षात, देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाचे स्मरण हे सर्व जाती-धर्मातील लोकांनी केले पाहिजे. मग आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्याकडे इतिहासाने आणि समाजाने उपेक्षेने का पाहिले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कदाचित, त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचली नसल्यामुळे ही उपेक्षा निर्माण झाली असावी. म्हणूनच, या आद्यक्रांतिकारकाच्या जीवनकार्याचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे रामोशी समाजात झाला. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत रामोशी समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फेकल्या गेल्यामुळे या समाजाला स्थिर उपजीविकेची साधने उपलब्ध नव्हती. परिणामी, अनेकांना उदरनिर्वाहासाठी दरोडे आणि लुटमारीचा मार्ग स्वीकारावा लागत असे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात विविध बहुजन समाजांतील शूर, निष्ठावान आणि युद्धकौशल्य असलेल्या व्यक्तींना आपल्या सैन्यात स्थान दिले. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रत्नपारखी होते. पुरंदर परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये राहणाऱ्या धाडसी, शूर आणि प्रामाणिक रामोशी समाजालाही त्यांनी स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतले. अनेक रामोशी वीरांनी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवले आणि प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना वतने, इनामे आणि सन्मान बहाल करण्यात आले. त्यामुळे या समाजाला स्थैर्य प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरही रामोशी समाजाने स्वराज्याशी निष्ठा कायम ठेवली. पेशवाईच्या अखेरपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. याच परंपरेतून पुढे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे व्यक्तिमत्त्व घडले.
उमाजी नाईक यांचा जन्म लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांच्या पोटी झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना “नाईक” ही पदवी प्राप्त झाली. उमाजी लहानपणापासूनच हुशार, धाडसी, चपळ, करारी आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेरकला, दांडपट्टा, तलवार, भाले, कुऱ्हाडी, तीर-कामठी आणि गोफण चालविण्याची कला लहान वयातच आत्मसात केली.
दरम्यान, इंग्रजांनी हिंदुस्तानात आपले राज्य विस्तारण्यास सुरुवात केली. मराठ्यांच्या प्रदेशावरही त्यांनी हळूहळू कब्जा मिळवला. १८०३ मध्ये पुण्यावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतर पुरंदरसह अनेक किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आली. परिणामी, रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. दुसरीकडे, इंग्रजी सत्तेचे अत्याचार वाढू लागले. या अन्यायाने करारी स्वभावाचा उमाजी अस्वस्थ झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानून उमाजी नाईकांनी स्वराज्याचा विचार स्वीकारला. “माझ्या देशावर परकीयांचे राज्य चालू देणार नाही” असा निर्धार करून त्यांनी विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी आणि बापू सोळस्कर यांना सोबत घेतले. जेजुरी येथील कुलदैवत श्री खंडोबाच्या साक्षीने त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची शपथ घेतली आणि सशस्त्र बंडाची घोषणा केली.
उमाजी नाईकांनी इंग्रज अधिकारी, सावकार आणि मोठ्या वतनदारांविरुद्ध कारवाया करून गरीब आणि वंचित जनतेला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. स्त्रियांवर अन्याय झाल्यास ते भावाप्रमाणे धावून जात असत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता वाढू लागली. इंग्रजांविरोधातील कारवायांमुळे १८१८ मध्ये उमाजी नाईकांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. मात्र, त्यांनी या काळाचा सदुपयोग करून वाचन आणि लेखन शिकले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र केला. जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने इंग्रज प्रशासन चिंतेत पडले.
उमाजी नाईकांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश आणि इतर अधिकाऱ्यांनी अनेक मोहिमा राबवल्या. मात्र, पुरंदर परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये झालेल्या अनेक संघर्षांमध्ये इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. एका लढाईत उमाजी नाईकांनी इंग्रज सैन्याचे मोठे नुकसान केल्याचे उल्लेख आढळतात. त्यामुळे इंग्रज प्रशासनामध्ये त्यांच्या नावाची दहशत निर्माण झाली. १८२४ मध्ये उमाजी नाईकांनी भांबुर्डा येथील इंग्रजी खजिना हस्तगत करून त्यातील संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. ३० नोव्हेंबर १८२७ रोजी त्यांनी इंग्रजांना इशारा देताना म्हटले होते की, “आज हे एक बंड असले तरी उद्या अशी हजारो बंडे उभी राहतील आणि तुम्हाला जेरीस आणतील.” हा इशारा पुढील स्वातंत्र्यलढ्याची चाहूल देणारा होता. २१ डिसेंबर १८३० रोजी मांढरदेवी परिसरात झालेल्या संघर्षात उमाजी नाईकांच्या सैन्याने इंग्रजांना मोठा प्रतिकार केला. त्यांच्या गनिमी युद्धतंत्रामुळे इंग्रजांना अनेकदा माघार घ्यावी लागली.
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात त्यांनी इंग्रजी नोकऱ्या सोडण्याचे, इंग्रजांना महसूल न देण्याचे, त्यांच्या खजिन्यांवर हल्ले करण्याचे आणि सर्व भारतीयांनी एकत्र येऊन इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. हा जाहीरनामा स्वराज्याच्या विचाराचा प्रारंभीचा घोष मानला जाऊ शकतो. उमाजी नाईकांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रज प्रशासन घाबरले. त्यांनी थेट युद्धाऐवजी कूटनीतीचा मार्ग स्वीकारला. मोठे सावकार, वतनदार आणि उमाजींच्या काही सहकाऱ्यांना आमिषे दाखवून फितूर करण्यात आले. उमाजी नाईकांची माहिती देणाऱ्यास दहा हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन देण्याची घोषणा करण्यात आली. अखेरीस, विश्वासघातातून १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली येथे उमाजी नाईकांना पकडण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला आणि पुण्यातील मामलेदार कचेरीत त्यांना कैद करण्यात आले. त्यांना पकडणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा अभ्यास केला. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुकही केले होते.
शेवटी, न्यायाधीश जेम्स टेलर यांनी उमाजी नाईकांना फाशीची शिक्षा सुनावली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यातील खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीसमोर वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी त्यांचे पार्थिव तीन दिवस सार्वजनिकरीत्या झाडाला टांगून ठेवले. त्यांच्या सोबत खुशाबा नाईक आणि बापू सोळस्कर यांनाही फाशी देण्यात आली.
”मरावे परी कीर्तिरूपे उरावे” या उक्तीप्रमाणे आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक आजही भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक तेजस्वी दीपस्तंभ आहेत. दुर्दैवाने, त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर जे स्थान मिळायला हवे होते, ते अद्याप मिळालेले नाही. आज गरज आहे ती त्यांच्या कार्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची, त्यांच्या बलिदानाला योग्य तो सन्मान देण्याची आणि त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रारंभीच्या महान क्रांतिकारकांपैकी एक म्हणून इतिहासात योग्य स्थान मिळवून देण्याची.
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः