इतिहास हा केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसतो; तो समाजाच्या सामूहिक स्मृतीचा, अस्मितेचा आणि विचारपरंपरेचा आरसा असतो. त्यामुळे इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे मूल्यमापन करताना श्रद्धेपेक्षा सत्याला, परंपरेपेक्षा पुराव्याला आणि भावनेपेक्षा चिकित्सक दृष्टीला अधिक महत्त्व द्यावे लागते. विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीही अनेक दंतकथा, आख्यायिका आणि समजुतींचे जाळे विणले गेले आहे. त्यापैकी सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी राहिलेला प्रश्न म्हणजे – “शिवरायांचे खरे प्रेरक कोण होते? समर्थ रामदास स्वामी की संतश्रेष्ठ तुकाराम महाराज?”
आजवरच्या इतिहासलेखनात समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु आणि प्रेरणास्थान असल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. त्याचवेळी अनेक अभ्यासक, संशोधक आणि पुरोगामी विचारवंतांनी संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधन कार्याला स्वराज्यनिर्मितीची सामाजिक प्रेरणा मानले. परिणामी, हा प्रश्न केवळ दोन संतांमधील तुलनापुरता मर्यादित राहिला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासदृष्टीचा, सामाजिक चेतनेचा आणि वैचारिक प्रवाहाचा विषय बनला.
मात्र, इतिहासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे – शिवाजी महाराजांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून समर्थ रामदास अथवा संत तुकाराम महाराज यांचा कोणताही समकालीन, अस्सल आणि निर्विवाद पुरावा उपलब्ध आहे का? उपलब्ध ऐतिहासिक साधने, समकालीन दस्तऐवज, पत्रव्यवहार आणि घटनाक्रम यांचा अभ्यास केल्यास या प्रश्नाचे उत्तर सहज मिळत नाही. अशा वेळी, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलेला विचार महत्त्वाचा ठरतो – “जेव्हा कागदोपत्री पुरावे उपलब्ध नसतात, तेव्हा तार्किक बुद्धीचा वापर करून इतिहासाची चिकित्सा केली पाहिजे.”
विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे कोणत्याही एका जातीचे, धर्माचे किंवा पंथाचे राज्य नव्हते. ते अठरापगड जाती-जमातींच्या सहभागातून उभे राहिलेले लोककल्याणकारी राज्य होते. त्यामुळे शिवरायांच्या प्रेरणास्त्रोतांचा शोध घेताना केवळ व्यक्तींचा विचार करून चालणार नाही; तर त्या काळातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणाचाही विचार करावा लागेल.
स्वराज्याची सुरुवात आणि रामदासांचा कालक्रम
श्री वि. ल. भावे यांच्या मते, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला इ.स. १६४० च्या सुमारास प्रारंभ झाला; तर प्रत्यक्ष स्वराज्य स्थापनेच्या कार्याची सुरुवात इ.स. १६४५ मध्ये झाली. श्री नरहर कुरुंदकर यांच्या मते, शिवरायांची राजमुद्रा असलेले पहिले पत्र इ.स. १६४६ मधील असून हा निष्कर्ष सभासद बखर आणि शिवभारत यांच्याशी सुसंगत आहे.
विशेष म्हणजे, या कालखंडापर्यंत समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेलेही नव्हते. ही बाब लक्षात घेतली तर स्वराज्यनिर्मितीच्या प्रारंभीच्या प्रेरणेत रामदासांचा सहभाग असल्याचा दावा गंभीर चिकित्सेची मागणी करतो.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी “राष्ट्रगुरू रामदास” या लेखातून समर्थ रामदास यांचा शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि स्वराज्याच्या उभारणीवर प्रभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये उत्तरकालीन रामदासी बखरींचा मोठ्या प्रमाणावर आधार घेतलेला दिसतो. इतिहास संशोधनाच्या निकषांनुसार या बखरी सर्वाधिक अविश्वसनीय मानल्या जातात, कारण त्या मुख्यत्वे पेशवेकालीन काळात रचल्या गेल्या आहेत.
समर्थ रामदास महाराष्ट्रात प्रथम इ.स. १६४४ मध्ये आले. त्यांनी प्रारंभी महाबळेश्वर परिसरात वास्तव्य केले. मात्र, त्या काळात महाबळेश्वर, जावळी आणि आसपासचा प्रदेश हा शिवरायांच्या शत्रूंच्या ताब्यात होता. त्यामुळे त्या काळात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली असावी, असा निष्कर्ष काढण्यास कोणताही ऐतिहासिक आधार उपलब्ध होत नाही.
रामदासी संप्रदायाच्या दासविश्रामधाम या ग्रंथानुसार, त्या काळात रामदास तथाकथित “पिशाचलिला” करीत होते आणि त्यामुळे त्यांना “पिसाट रामदास” म्हणूनही ओळखले जात असे. याच काळात त्यांनी आदिलशाहीच्या प्रदेशातील चाफळ येथे इ.स. १६४८ मध्ये श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याचवेळी विजापूरच्या सरदारांकडून त्यांना इनामी जमिनीही प्राप्त झाल्या. दियानतराव आणि बाजी घोरपडे यांनी त्यांना इनामे दिली आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. विशेष म्हणजे, याच बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले होते.
या सर्व घटनांचा विचार केला असता, त्या काळात शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष संबंध नव्हता, हेच अधिक स्पष्टपणे दिसून येते.
तुकोबांची वाणी आणि स्वराज्याची सामाजिक पायाभरणी
इतिहासातील एक निर्विवाद वास्तव असे आहे की, शिवरायांच्या स्वराज्य उभारणीस जवळपास नऊ वर्षे पूर्ण झाली होती, तोपर्यंत समर्थ रामदासांचे पाऊलही शिवरायांच्या प्रदेशात पडले नव्हते. ते त्या काळात शत्रूंच्या प्रदेशातच कार्यरत होते. दुसरीकडे, बहिणाबाईंच्या आत्मचरित्रावरून असे दिसते की, समर्थ रामदास महाराष्ट्रात येण्याच्या अनेक वर्षांपूर्वीपासूनच संत तुकाराम महाराजांची कीर्ती आणि अभंगवाणी महाराष्ट्रभर दुमदुमत होती.
म्हणूनच एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो – मावळ प्रदेशातील जनतेच्या मनात स्वराज्याची आकांक्षा, अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा आणि सामूहिक चेतनेची बीजे कोणी पेरली?
महाराष्ट्रधर्मकार भा. वा. भट म्हणतात की, शिवकालीन महाराष्ट्रातील क्रांतीचा विचार करताना केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही, तर त्या काळातील समाजाचा आत्मा कसा होता, याचाही विचार करावा लागेल. महाराष्ट्रातील संतपरंपरेने समता, बंधुता आणि लोकजागृतीचे कार्य केले. भजनी मेळ्यांमुळे समाजात चेतना निर्माण झाली आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना उभारण्यासाठी जागृत समाजाचा पाया मिळाला.
श्री त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या मते, शिवाजी महाराजांनी प्रथम समर्पित सहकारी आणि मित्र जोडले; परंतु समाजाची मानसिक उंची वाढविण्याचे कार्य त्यांना राजकारणातील व्यस्ततेमुळे करता आले नाही. मग हा सामाजिक पाया कोणी तयार केला?
कीर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते यांच्या मते, संत तुकारामांच्या अभंगवाणीने बहुजन समाजात जागृती निर्माण करून समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय मूल्यांची ओळख करून दिली. संतांमध्ये तुकाराम महाराजांचे कार्य विशेष उठून दिसते. त्यांच्या सोप्या, रसाळ आणि अर्थपूर्ण अभंगांनी महाराष्ट्राच्या जनमानसात नवचैतन्य निर्माण केले.
श्री बाळशास्त्री हरदास लिहितात की, “तुकाराम महाराजांमुळे पंडित-अपंडित, शूद्र-अतिशूद्र असा सर्व बहुजन समाज भक्ती आणि धर्मनिष्ठेच्या सूत्रात एकत्र बांधला गेला.” तर ह. श्री. शेणोलीकर यांच्या मते, “तुकारामांच्या विधायक कार्यामुळे शिवकार्याला उपयुक्त असा ध्येयवादी, सुसंघटित आणि कार्यक्षम समाज निर्माण झाला.”
मावळ्यांना जर कोणते धार्मिक वाङ्मय परिचित असेल, तर ते तुकोबांचे अभंगच होते. धर्मनीती, व्यवहारज्ञान आणि नैतिकतेचे शिक्षण त्यांना तुकोबांच्या कीर्तनातूनच प्राप्त झाले होते. त्यामुळे स्वराज्याच्या सामाजिक पायाभरणीत संत तुकाराम महाराजांच्या कार्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे ठरते.
उपलब्ध ऐतिहासिक पुरावे, कालक्रम, सामाजिक परिस्थिती आणि समकालीन संदर्भ यांचा विचार केल्यास, समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु किंवा स्वराज्यनिर्मितीचे प्रेरणास्थान होते, असा निर्विवाद निष्कर्ष काढणे कठीण आहे. दुसरीकडे, संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधन कार्याने महाराष्ट्रातील समाजमन तयार करण्यात आणि स्वराज्याला आवश्यक सामाजिक अधिष्ठान निर्माण करण्यात योगदान दिल्याचे अनेक अभ्यासक मान्य करतात.
तथापि, शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि स्वराज्याच्या उभारणीची मूळ प्रेरणा शोधायची झाल्यास, ती सर्वप्रथम शहाजीराजांच्या धैर्यात, जिजाऊंच्या संस्कारांत, महाराष्ट्राच्या संतपरंपरेच्या लोकजागृतीत आणि स्वतः शिवाजी महाराजांच्या असामान्य नेतृत्वगुणांमध्येच शोधावी लागेल.
इतिहासाचा अभ्यास श्रद्धेने नव्हे, तर चिकित्सक बुद्धीने केला तरच सत्याच्या अधिक जवळ पोहोचता येते. आणि म्हणूनच समर्थ रामदासांनीच दिलेला हा उपदेश आजही तितकाच समर्पक वाटतो –
“अक्षरे गाळून वाची ।
कां ते घाली पदरची ॥
निगा न करी पुस्तकांची ।
तो एक मूर्ख ॥”
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः