Features

संतश्रेष्ठ तुकोबाराय : वैकुंठगमन, निर्वाण आणि संशोधनाची गरज

   ”ज्ञानबा-तुकाराम” ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची केवळ दोन नावे नाहीत, तर महाराष्ट्राच्या आत्म्याची दोन स्पंदने आहेत. साने गुरुजींनी स्वप्न आणि सत्य या ग्रंथात म्हटले आहे की, “ज्ञानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे, कारण ते सर्व थरांपर्यंत पोहोचले आहे.” संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगवाणीत केवळ भक्तिभाव नाही, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाचे, समतेचे आणि सत्यशोधनाचे तत्त्वज्ञान सामावलेले आहे.

   प्रा. न. र. फाटक यांनी तुकोबारायांच्या वाङ्मयाचे महत्त्व अधोरेखित करताना लिहिले आहे की, “तुकोबांच्या वाणीत जे तेज आणि सत्त्व आहे, त्याची खरी ओळख असणाऱ्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची स्वतंत्र ओळख करून घेतली नाही तरी चालेल; कारण तुकोबांच्या लिखाणात या सर्व संतांच्या शिकवणीचे सार सापडते. म्हणूनच तुकोबांना भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली.”

   अशा या परमोज्ज्वल कळसाबद्दल जनमानसात अपार श्रद्धा आहे. मात्र वारकरी संप्रदायासाठी तुकोबाराय हे केवळ संत नाहीत; ते जीवनाचे अधिष्ठान आहेत. तुकोबाराय स्वतः म्हणतात –

जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पाढिये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥

जसे कमळाचे जीवन सूर्यामुळे आहे, तसेच वारकऱ्यांचे जीवन तुकोबारायांमुळे आहे. त्यामुळेच त्यांच्या निर्वाणाचा प्रश्न हा केवळ ऐतिहासिक वा धार्मिक विषय राहत नाही, तर तो महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीशी निगडित असा एक गंभीर सांस्कृतिक प्रश्न बनतो.

तुकोबारायांच्या निर्वाणाबाबतचे मतभेद

   संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या निर्वाणासंबंधी अनेक विद्वान, संशोधक आणि साहित्यिकांनी विचारमंथन केले आहे. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांच्यापासून ते आधुनिक संशोधकांपर्यंत अनेकांनी या विषयावर आपापली मते मांडली आहेत. श्री. वा. सी. बेंद्रे यांसारख्या संशोधकांनी ऐतिहासिक आणि साहित्यिक पुराव्यांच्या आधारे या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आधुनिक काळातील काही सामाजिक विचारवंतांनी तर तुकोबारायांचा खून झाल्याची शक्यताही स्पष्टपणे मांडली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही आपल्या ओघवत्या शैलीत हा प्रश्न उपस्थित केला आहे –

“मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ॥”

या एका ओळीत तुकोबारायांच्या निर्वाणाभोवती निर्माण झालेल्या संपूर्ण गूढतेचे सार दडलेले आहे.

निर्वाण अभंगांची चिकित्सक छाननी

   तुकोबारायांच्या निर्वाणाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अभंगांचा आधार घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. परंतु येथे एक महत्त्वाची अडचण आहे. आज उपलब्ध असलेल्या गाथा कालानुक्रमाने संपादित केलेल्या नाहीत. तुकोबारायांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी अभंग क्रमाने लिहून ठेवले असण्याची शक्यता असली तरी तशी अस्सल आणि संपूर्ण गाथा आज उपलब्ध नाही.

   आज उपलब्ध असलेल्या गाथांमध्ये अभंगांची विषयानुसार विभागणी केलेली आहे. विशेष म्हणजे, सर्व गाथांमध्ये ही विभागणी आणि अभंगसंख्या सारखी नाही. त्यामुळे निर्वाणप्रकरणातील अभंगांबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.

   निरनिराळ्या गाथांमधील निर्वाणप्रकरणातील अभंगांचे तर्कशुद्ध परीक्षण केले असता असे लक्षात येते की, हे अभंग मोठ्या प्रमाणात संकलनात्मक स्वरूपाचे आहेत. प्रत्येक संपादकाने आपापल्या भूमिकेला पूरक वाटतील असे अभंग निवडून निर्वाणप्रकरण तयार केलेले दिसते. काही संशोधकांच्या मते तर काही अभंग प्रक्षिप्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   उदाहरणार्थ, एका अभंगात चतुर्भुज हरी गरुडावर आरूढ होऊन तुकोबारायांना घेण्यासाठी येतात. पुढील अभंगात तुकोबाराय कुडीसकट गुप्त होतात. त्यानंतरही अभंगरचना सुरूच राहते. एका ठिकाणी –

तुका बैसला विमानी ॥

असे वर्णन येते, तर पुढील अभंगात तुकोबाराय क्षीरसागरात सिंहासनावर विराजमान झाल्याचे वर्णन आहे. त्यानंतर वाराणसीपर्यंत निरोप पोहोचल्याचेही उल्लेख येतात. या सर्व वर्णनांमध्ये आढळणारी परस्परविसंगती संशोधनासाठी महत्त्वाची ठरते.

   तसेच “चौकोशावरी थांबवली विमाने, पत्र हे तेथून तुम्हा लिहिले” आणि “स्वर्गलोकीहून आले हे अभंग” यांसारख्या उल्लेखांमुळे अनेक तार्किक प्रश्न निर्माण होतात. जर विमान चार कोसांवर थांबले असेल, तर तेथून लिहिलेले पत्र पृथ्वीवरील की स्वर्गातील? “टाळगोधडी”चा वारंवार होणारा उल्लेख, अभंगपत्रांचा घटनाक्रम आणि उपलब्ध परंपरा यामध्येही सुसंगती दिसत नाही.

श्रद्धा की सत्य?

   काही भक्तांचा असा प्रश्न असू शकतो की, शतकानुशतके लोकश्रद्धेत दृढ झालेल्या वैकुंठगमनाच्या संकल्पनेवर नव्याने विचार करून काय साध्य होणार? “जाले तेंव्हा जाले, मागील ते मागे” असे म्हणत हा प्रश्न टाळणे सहज शक्य आहे. परंतु सत्यशोधन हे स्वतःमध्येच एक मूल्य आहे.

तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात –

तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे ॥

आणखी एका ठिकाणी ते म्हणतात –

अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ।
बरे पारखून बांधा गाठी ॥

तुके तरी तुकी खर्याचे उत्तम ।
मुलामांचा भ्रम कोठवरी ॥

तुकोबारायांची शिकवणच अशी आहे की, श्रद्धेपेक्षा सत्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. ते स्पष्टपणे म्हणतात –

नये भिडा सांगो आन ॥

आणि,

काकुळतीसाठी सत्याचा विसर ।
पडले अंतर न पाहिजे ॥

म्हणूनच तुकोबारायांच्या निर्वाणाचा प्रश्न श्रद्धेपेक्षा विवेकाच्या आधारे तपासणे हेच त्यांच्या शिकवणीशी सुसंगत ठरते.

संशोधनापुढील खरे ध्येय

   तुकोबारायांच्या देहाचे नेमके काय झाले, हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी संशोधनाचा हेतू केवळ तोच असू शकत नाही. खरा प्रश्न असा आहे की, तुकोबारायांच्या देहाबरोबरच त्यांच्या समतावादी, मानवतावादी आणि विवेकनिष्ठ तत्त्वज्ञानालाही वैकुंठाच्या कल्पनेत हरवून टाकण्याचा प्रयत्न झाला काय?

पावलो पंढरी वैकुंठभवन ॥

असे म्हणणाऱ्या तुकोबारायांना एखाद्या दूरस्थ स्वर्गलोकात जायचे होते की हे विश्वच वैकुंठरूप करायचे होते? हा प्रश्न समजून घेतल्याशिवाय तुकोबारायांचे कार्य समजणे अशक्य आहे.

तुकोबारायांच्या हत्येची शक्यता

   अनेक विचारवंतांच्या मते तुकोबारायांची हत्या झाली असावी. यामागे त्यांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान हे प्रमुख कारण असू शकते. कर्मकांडांपेक्षा भक्ती, वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदाचार आणि भेदाभेदाऐवजी समता यांचा त्यांनी पुरस्कार केला.

वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।
येरांनी वाहावा भार माथा ॥

असे निर्भयपणे सांगत त्यांनी वर्णाधारित श्रेष्ठत्वाला आव्हान दिले. तसेच –

भेदाभेद अमंगळ ॥

असे म्हणत त्यांनी समतेचा ध्वज उंचावला. त्यामुळे तत्कालीन वर्णश्रेष्ठत्ववादी आणि कर्मठ प्रवृत्ती त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या.

   मंबाजीसारख्या व्यक्तींनी तुकोबारायांना दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडविण्याचा प्रसंग हा त्याच संघर्षाचा भाग होता. पुढे तुकोबारायांना स्वतःलाही आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाली असावी. त्यांनी म्हटले आहे –

लावुनी कोलीत माझा करतील घात ॥

संत बहिणाबाईंच्या अभंगातही मंबाजीबद्दल –

मारु पाहे घात चिंतुनीया ॥

असा स्पष्ट उल्लेख आढळतो.

   दयानंद पोतदार यांनी संतकवि तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडलेला तर्कही विचार करण्याजोगा आहे. त्यांच्या मते, तुकोबारायांचा गुप्तपणे वध झाला असावा आणि त्या घटनेचे सत्य दडविण्यासाठी यात्रा, जलसमाधी आणि नंतर सदेह वैकुंठगमन अशा विविध कथा रूढ झाल्या असाव्यात.

जिजाबाई, कान्होबा आणि तुकोबारायांचा परिवार

   जर तुकोबारायांचे खरोखरच सदेह वैकुंठगमन झाले असते, तर त्यांच्या कुटुंबावर समाजाने सन्मानाचा वर्षाव केला असता. त्यांच्या स्मृतीचे भव्य स्मारक उभे राहिले असते. त्यांचे अभंग तातडीने संकलित करण्यात आले असते. परंतु इतिहास वेगळेच चित्र दाखवतो.

   तुकोबारायांच्या निर्वाणानंतर काही महिन्यांतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला देहू सोडावे लागले. जिजाबाई खेड येथे गेल्या, तर कान्होबा सुदुंबरे येथे राहू लागले. कान्होबांच्या अभंगांमधून या दुर्दैवी परिस्थितीचे हृदयद्रावक चित्र दिसते –

आक्रंदती बाळे करूणावचनी ।
त्या शोके मेदिनी फुटो पाहे ॥

माझे बुडविले घर ।
लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार ।
तारातीर करोनि ॥

काही विपत्ती अपत्या ।
आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ?
पाहा, बोलों कासया ? ॥

या अभंगांतून केवळ शोक नव्हे, तर भय, असुरक्षितता आणि सामाजिक दडपणाची भावना स्पष्ट दिसते.

मंबाजीचा विषारी उपहास

   गोपाळबुवांनी नारायणबाबा चरित्राख्यान मध्ये दिलेल्या उल्लेखानुसार, तुकोबारायांचे पुत्र नारायणबुवा देहूला आल्यानंतर मंबाजी त्यांना म्हणाला –

म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ?
नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासी जाऊन मेला ॥

   विशेष म्हणजे, पित्याची उत्तरक्रिया झालेली नाही या कारणावरून त्याने नारायणबुवांना देवमूर्तीला स्पर्शही करू दिला नाही. हा प्रसंग त्या काळातील वातावरण, संशय आणि कटुतेचे प्रतीक म्हणून अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

हत्येला जात नव्हे, तर मनोवृत्ती जबाबदार

   तुकोबारायांच्या संभाव्य हत्येसाठी एखाद्या विशिष्ट जातीला जबाबदार धरणे हे त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या पूर्णतः विरुद्ध आहे. तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात –

नाही यातीकुळ । फासे ओढी तयासी ॥

दुष्टता ही कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नसते. तुकोबारायांच्या विरोधामागे कार्यरत असलेली शक्ती म्हणजे वर्णश्रेष्ठत्व, सामाजिक मिरासदारी आणि विषमतेचे समर्थन करणारी एक विशिष्ट मनोवृत्ती होती.

   म्हणूनच तुकोबारायांची खरी भक्ती म्हणजे जातीय द्वेष वाढविणे नव्हे, तर त्यांच्या समतावादी विचारांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे होय. तुकोबारायांचे अंतिम तत्त्वज्ञान त्यांनीच स्पष्ट केले आहे –

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥

संतश्रेष्ठ तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन झाले, त्यांची हत्या झाली किंवा त्यांचे निर्वाण अन्य कोणत्या प्रकारे झाले, हा प्रश्न कदाचित इतिहास पूर्णपणे सोडवू शकणार नाही. परंतु या प्रश्नाच्या निमित्ताने आपण तुकोबारायांच्या शिकवणीचा पुनर्विचार करू शकतो.

तुकोबारायांनी स्वतःच सांगितले आहे –

वंदिले वंदावे, निंदिले निंदावे ।
न धरावी चाली, करावा विचार ॥

म्हणूनच तुकोबारायांचे खरे स्मरण हे अंधश्रद्धा किंवा अंधनकारात नव्हे, तर विवेक, सत्यशोधन, समता आणि मानवतेच्या मार्गानेच होऊ शकते. त्यांच्या देहाचे गूढ उकलले नाही तरी चालेल; पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ हरवू देता कामा नये. कारण तुकोबारायांचे खरे वैकुंठ हे आकाशात नव्हे, तर मानवाच्या अंतःकरणात आणि समतामूलक समाजव्यवस्थेतच आहे.

संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली] स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी] प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७ श्री.न.र.फ़ाटक] महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे] संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ] नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा] व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]

Check Also

फुले-आंबेडकरांच्या विचारांपलीकडे हिंदू धर्म समजून घेणे आवश्यक

   भारतात गेल्या काही दशकांत एक विशिष्ट प्रवृत्ती वाढताना दिसते. हिंदू धर्माविषयी चर्चा झाली की अनेकदा …